भाजपमध्ये इनकमिंगला वेग ; माजी उपमहापौर दिलीप बराटे, माजी नगरसेवक अभिजीत शिवकर यांचा प्रवेश

पुणे :

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर भाजपमध्ये इनकमिंगला जोर आला आहे. माजी उपमहापौर दिलीप बराटे आणि माजी नगरसेवक अभिजीत शिवकर यांनी शनिवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपने काँग्रेसला आणखी एक धक्का दिला असून, शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनील कांबळे, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. एकीकडे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चितीची प्रक्रिया सुरू असतानाच भाजपमध्ये अनुभवी आणि तरुण नेत्यांचा ओघ वाढताना दिसत आहे.

माजी उपमहापौर दिलीप बराटे हे वारजे परिसराचे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ ते पुण्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख होती. भाजपमध्ये प्रवेश करताना बराटे यांनी, आपण उमेदवारीसाठी पक्षात आलो नसून संघटनात्मक कामासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी पतित पावन संघटनेत कार्य केल्याचा उल्लेख करत, माझा पुतण्या भाजपमध्ये कार्यरत असून तो निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

माजी नगरसेवक अभिजीत शिवकर हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवकर यांचे पुत्र आहेत. २००७ मध्ये ते वानवडी परिसरातून महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सुमारे चौदा वर्षांच्या राजकीय विश्रांतीनंतर भाजपमधून नव्याने राजकीय प्रवास सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बराटे आणि शिवकर यांचे स्वागत केले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी, दिलीप बराटे यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा पक्षाला लाभ होईल, तर अभिजीत शिवकर यांच्यासारखा तरुण कार्यकर्ता मिळाल्याने संबंधित भागात भाजपची ताकद वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.

आणखी वाचा   एक मिनिटाचा विलंब ठरला निर्णायक; स्थायी समिती अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड