जुबैरचे थेट संबंध आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कशी

पुणे :

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संगणक अभियंता जुबैर हंगरगेकर याला पुन्हा अटक करून शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने जुबैरला ३ जानेवारीपर्यंत ११ दिवसांची एटीएस कोठडी सुनावली आहे.

तपास यंत्रणांचा दावा आहे की जुबैरकडून मिळालेल्या डिजिटल व गुप्तचर पुराव्यांमधून त्याचा थेट संबंध आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कशी विशेषतः अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि महाराष्ट्रातील पडघा गावाशी जोडला गेला आहे.

कोंढवा येथील छापेमारीनंतर एटीएसने २७ ऑक्टोबर रोजी त्याला अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत होता. तपासात महत्वाचे धागे मिळाल्याने त्याला पुन्हा अटक करण्यात आले आहे.एटीएसच्या माहितीनुसार, जुबैर पुण्यातील एका आयटी कंपनीत कार्यरत होता. मात्र प्रत्यक्षात तो कट्टरपंथी विचारसरणीचा सक्रिय प्रचारक होता. तो ठाणे जिल्ह्यातील पडघा गावात वारंवार जात असे.

तेथे त्याला युवकांना भडकवण्यासाठी, जिहाद व खलिफत याविषयी भाषणे देण्यासाठी आणि भारतविरोधी हिंसाचारासाठी मानसिक तयारी करून देण्यासाठी खास पाठवले जात होते. डिसेंबर २०२३ मध्ये एटीएसने पडघा येथे पहाटे तीन वाजता छापा टाकला असता, त्याची पूर्वकल्पना लागल्याने तो फरार झाला होता. सुमारे दोन वर्षांनंतर त्याच्या अटकेमुळे संपूर्ण नेटवर्कची पाळेमुळे उघड होऊ लागली आहेत.

आणखी वाचा   मूळच्या बिहारच्या चार महिलांनी बोगस मतदान केल्याचा आरोप