जगताप–मिटकरी वाद चिघळला

पुणे –

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत हालचालींना वेग आला असताना, पुण्यात या विषयावरून राजकीय वातावरण तापले आहे. एकत्रिकरणाबाबत निर्णय जवळपास अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी प्रशांत जगताप यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली होती. राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत एकत्र येण्याचा निर्णय होत असताना काही नेते त्याला अडथळा आणत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या टीकेमुळे पुण्यातील राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले.
दरम्यान, अमोल मिटकरी यांच्या आरोपांना प्रशांत जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “मी एका ठरावीक विचारधारेवर विश्वास ठेवून लोकांच्या मतांवर निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे. वैचारिक भूमिकेशी तडजोड करणे मला मान्य नाही,” अशी भूमिका जगताप यांनी स्पष्ट केली. तसेच, “लोकांतून निवडून आलेल्या नेत्यांनीच माझ्याशी राजकीय चर्चा करावी,” असे आव्हान देत त्यांनी अप्रत्यक्षपणे मिटकरी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले असून, पुण्यातील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची होत असल्याचे चित्र आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद कोणते वळण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा   लोकशाही वाचवण्यासाठी पुणेकरांनी पुढे यावे- माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन