* निर्णय घाईत नको, अजून विचाराची संधी



पुणे:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानंतर शहराच्या राजकारणात निर्माण झालेल्या अस्थिरतेवर शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी समतोल आणि समजूतदार भूमिका मांडली आहे. राजकीय मतभेद असूनही अनुभवी कार्यकर्त्याचा सन्मान राखला पाहिजे, असा स्पष्ट संदेश धंगेकर यांनी दिला आहे.
प्रशांत जगताप यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत बोलताना धंगेकर म्हणाले की, “प्रशांतदादा हे पुणे शहराच्या राजकारणातील अनुभवी आणि कष्टकरी कार्यकर्ते आहेत. महापौरपदासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. कार्यकर्ता घडायला अनेक वर्षे जातात, त्यामुळे असा निर्णय घेताना अत्यंत विचारपूर्वक पाऊल उचलले पाहिजे.”
राजकारणात एकदा घेतलेला निर्णय बदलणे कठीण असते, याकडे लक्ष वेधत धंगेकर म्हणाले, “निर्णय घेतल्यानंतर पुन्हा उभं राहण्यासाठी मोठी लढाई लढावी लागते. त्यामुळे घाईघाईत पाऊल टाकू नये. अजून निवडणुकीचा अर्ज भरण्याची मुदत शिल्लक आहे, त्यामुळे शांतपणे विचार करण्याची संधी आहे.”
पक्षांतर्गत मतभेदांवर भाष्य करताना धंगेकर यांनी पक्षप्रमुखांची भूमिका अधोरेखित केली. “कधी कधी कार्यकर्त्याला अन्याय झाल्यासारखे वाटू शकते. मात्र पक्षप्रमुख निर्णय घेत असताना पक्ष आणि कार्यकर्त्यांचे व्यापक हित डोळ्यासमोर ठेवतात. राजकारणात वैयक्तिक भावना बाजूला ठेवाव्या लागतात,” असे ते म्हणाले.
प्रशांत जगताप यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. यावर धंगेकर म्हणाले, “जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पुणे शहर आणि पुणेकरांच्या हिताचा असावा. त्यांनी तज्ज्ञांचा, तसेच शहरातील ज्येष्ठ आणि अनुभवी राजकारण्यांचा सल्ला घ्यावा. अनेकांशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा.”
















