सराईत गुन्हेगाराने केला पोलिसांनवर गोळीबार

पुणे:

वाहने तोडफोडीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या चंदननगर पोलिस पथकावर सराईत गुन्हेगाराने पिस्तुलातून गोळीबार केला. पोलिसांनी स्वरक्षणार्थ गोळीबार केल्यावर गुन्हेगाराच्या पायावर गोळी लागली.

त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एखाद्या हिंदी अॅक्शन चित्रपटात शोभेल असा प्रकार पुण्यात घडला. वाघोली- आव्हाळवाडी रस्त्यावर शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. ओमकार भंडारे (वय २५, रा. चंदननगर) असे गोळीबारात जखमी झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

चंदननगर परिसरात शुक्रवारी रात्री भंडारे आणि त्याच्या साथीदाराने रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांची कुऱ्हाडीने तोडफोड करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोघांवर बेकायदा हत्यार बाळगणे आणि दहशत निर्माण केल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. तोडफोड केल्यावर आरोपी फरारी झाले होते. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू होता. वाघोली परिसरातील आव्हाळवाडी रस्त्यावर भंडारे फिरत असल्याची माहिती चंदननगर पोलिसांना मिळाली होती. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिस भंडारे याला पकडण्याचा प्रयत्न करीत होते. त्या वेळी भंडारेने जवळील बेकायदा पिस्तुलातून पोलिस पथकावर गोळीबार केला. पोलिसांनी स्वरक्षणार्थ गोळीबार केल्यावर भंडारे याच्या पायावर गोळी लागली आणि तो जखमी झाला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. असा थरारक प्रसंग वर्दळीच्या रस्त्यावर घडल्याने रस्त्यावर एकच गोंधळ उडाला.

आणखी वाचा   कादंबरी असते समाजाचा विस्तृत जीवनपट- .वि.दा. पिंगळे