पुणे :



पवार कुटुंबातील अपघाताच्या चौकशीसंदर्भात सतत माहिती आणि मुद्दे समोर आणत असलेल्या रोहित पवारच्या सुरक्षेबाबत सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी महत्त्वाचे विधान केले. सुळे म्हणाल्या, “रोहित प्रामाणिकपणे सत्यासाठी लढत आहे. त्याला पोलिस संरक्षण दिले जावे, ही माझी राज्य सरकारकडे विनंती असेल.”
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवाजीनगर येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीतर्फे आयोजित कार्यक्रमात सुळे यांनी अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, नेते विशाल तांबे, तसेच सक्षणा सलागर उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, “रोहित, पार्थ आणि जय या पवार मुलांमध्ये अपघाताबाबत खूप अस्वस्थता आहे. जयने चौकशीची मागणी केली आहे, कारण या घटनेमुळे अपघातावरून लोकांच्या मनात तसेच पवार कुटुंबातीलही प्रश्न निर्माण झाले आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण देश पवार कुटुंबावर प्रेम करतो, त्यामुळे हा धक्का प्रत्येकालाच बसला आहे.”
राज्यसभा खासदार निवडीसंदर्भात सुळे म्हणाल्या, “महाविकास आघाडीची मुंबईत बैठक झाली, पण मी उपस्थित नव्हते. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत मी सहभागी होईन आणि एकत्रित निर्णय तुम्हाला कळविला जाईल.”
त्यांनी विलीनीकरणाच्या चर्चेवरही भाष्य करत सांगितले, “एकत्रित काम करण्याची इच्छा होती, परंतु आता या विषयाला पूर्णविराम देणेच योग्य आहे. राजकारण आणि समाजकारणात आपल्या वयाने आणि अनुभवाने मोठ्यांवर का बोलावे, असा प्रश्न उपस्थित करावा लागतो.”

















