सराईत गुन्हेगाराकडून तीन पिस्तुले व १२ जिवंत काडतुसे जप्त

पुणे:

शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट-तीनच्या पथकाने सराईत गुन्हेगाराला अटक करत त्याच्याकडून तीन गावठी पिस्तुले आणि १२ जिवंत काडतुसे जप्त केली. या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याचे पोलिसांनी सांगितले.
सागर दत्तात्रेय सोनलकर (वय २५, रा. धायरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला.
१८ फेब्रुवारी रोजी सिंहगड रस्ता व नांदेड सिटी परिसरात गस्तीवर असताना गुन्हे शाखेच्या युनिट-तीनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे व त्यांच्या पथकाला आरोपी वडगाव बुद्रूक येथील प्रयेजा सिटी परिसरात आल्याची माहिती मिळाली. खातरजमा करून पोलिसांनी तत्काळ सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून तीन गावठी पिस्तुले व १२ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.
आरोपीला पुढील कारवाईसाठी नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याकडील शस्त्रसाठ्याबाबत अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकातील मारुती पारधी, नितीन जगदाळे, कैलास लिम्हण, तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुन्ला आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

आणखी वाचा   महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात चार दिवस ‘ड्राय डे’; तळीरामांना मोठा धक्का