काँग्रेस भवन हल्ला प्रकरण : महापौरांचे नाव वगळल्याने संशय; पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप

पुणे :

काँग्रेस भवनावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करताना महापौर मंजूषा नागपुरे यांचे नाव वगळण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. तक्रारीत स्पष्ट उल्लेख असतानाही पोलिसांनी त्यांचे नाव गुन्ह्यातून काढून टाकल्याचा आरोप काँग्रेसने केला असून यामागे पक्षपातीपणा असल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपने काँग्रेस भवनासमोर आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान वातावरण चिघळून दगडफेक झाली. यात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, पोलिस कर्मचारी तसेच पत्रकार जखमी झाले. या प्रकरणी परस्परांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या.

काँग्रेसच्या तक्रारीनुसार, हल्ल्यापूर्वी महापौर नागपुरे आणि भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी चिथावणीखोर भाषणे केली होती. त्यानंतरच कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. मात्र, गुन्हा नोंदवताना महापौरांचे नाव वगळण्यात आले, तर इतर कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली.

याविरोधात काँग्रेसने तीव्र आक्षेप घेत पोलिस प्रशासनावर थेट पक्षपातीपणाचा ठपका ठेवला आहे. “तक्रारीत नाव असतानाही महापौरांचे नाव वगळणे म्हणजे कायद्याचा दुजाभाव आहे,” असे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रकरण उच्च न्यायालयात नेण्याचा निर्णय काँग्रेसने जाहीर केला आहे. तसेच, पोलिसांनी आंदोलनास परवानगी देताना योग्य खबरदारी न घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. महापौरांचे नाव वगळल्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढला असून पुढील काही दिवसांत हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा   पुणे महापालिकेसाठी भाजपाला मोठी पसंती…अर्जांसाठी इच्छुकांच्या रांगा