डेक्कन परिसरात महापालिकेचा धडक मोर्चा : पाच ट्रकभर साहित्य जप्त, पदपथ मोकळे

पुणे :

शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या डेक्कन परिसरात महापालिकेने अतिक्रमणाविरुद्ध मोठी कारवाई करत रस्ते व पदपथ मोकळे केले. बालगंधर्व चौक ते डेक्कन मार्गे ज्ञानेश्वर पादुका चौक या मुख्य रस्त्यावर शनिवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेत सुमारे पाच ट्रकभर साहित्य जप्त करण्यात आले.

शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या या मार्गावर रस्ता, पदपथ, फ्रंट मार्जिन आणि साईड मार्जिनमध्ये वाढलेल्या अनधिकृत अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांची गैरसोय वाढली होती. नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींनंतर प्रशासनाने नियोजनबद्ध कारवाई हाती घेतली.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. पंधरा जणांचे विशेष पथक, जेसीबी, गॅस कटर, ओपन ट्रक तसेच महाराष्ट्र पोलीस सुरक्षा बलाच्या बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान व्यावसायिकांनी फ्रंट मार्जिनमध्ये ठेवलेल्या खुर्च्या, टेबल, लोखंडी जाळ्या, हातगाड्या, फ्रिज आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. रस्त्यालगत उभारलेली कच्ची-पक्की शेड, टपऱ्या आणि अनधिकृत संरचना हटविण्यासाठी काही ठिकाणी जेसीबीचा, तर लोखंडी बांधकामे काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला.

महापालिकेच्या माहितीनुसार, जप्त केलेले साहित्य ओपन ट्रकद्वारे ताब्यात घेण्यात आले असून एकूण पाच ट्रकभर माल जप्त झाला आहे. या मोहिमेमुळे डेक्कन परिसरातील पदपथ मोकळे झाल्याने पादचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

“पदपथांवरून चालणे कठीण झाले होते. आता तरी काही प्रमाणात मोकळीक मिळाली,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक अतिक्रमणमुक्त ठेवण्याचा निर्धार महापालिकेने व्यक्त केला आहे.

आणखी वाचा   प्रभाग ०९ मध्ये भाजपाचा पलटवार;