घसरणीला ब्रेक! पुण्यात काँग्रेसची पुनरागमनाची नांदी

पुणे :

गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने घसरत चाललेल्या काँग्रेसच्या राजकीय आलेखाला पुणेकरांनी अखेर दिलासा दिला आहे. नेत्यांची कमतरता, पक्षातील गळती, मित्रपक्षांची साथ सुटणे आणि प्रतिकूल राजकीय वातावरण अशा अनेक अडचणींवर मात करत काँग्रेसने महापालिका निवडणुकीत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. २०१७ च्या तुलनेत यंदा दोन आकडी जागा मिळवत पक्षाने आपले अस्तित्व पुन्हा ठळक केले आहे.
लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये शहर काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे महापालिका निवडणुकीत पक्षाची अवस्था बिकट राहील, अशी चर्चा होती. मात्र निवडणुकीची चाहूल लागताच काँग्रेसने भाजपविरोधी शक्तींना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शेवटपर्यंत ही भूमिका टिकवून ठेवण्याचा पक्षाने प्रयत्न केला.
दरम्यान, अंतर्गत मतभेद आणि काही नेत्यांच्या भूमिकेमुळे आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ऐनवेळी दूर झाली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसेला सोबत घेऊन निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र जागावाटपातील गोंधळामुळे अनेक प्रभागांत मित्रपक्षांमध्येच थेट लढती झाल्या, याचा फटका बसला.
राज्यस्तरीय नेतृत्वाकडून अपेक्षित पाठबळ न मिळाल्यानेही स्थानिक पातळीवरील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वबळावर प्रचार करत चांगली कामगिरी करून दाखवली. २०१७ मध्ये अवघ्या दहा जागांवर समाधान मानावे लागलेल्या काँग्रेसने यंदा १६ जागांवर विजय मिळवून शहरातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आपले स्थान पुन्हा मिळवले आहे.
जुने, ताकदवान नेते पक्ष सोडून गेल्यानंतरही काँग्रेसने तरुणांना संधी देत नवे चेहरे पुढे आणले. आक्रमक भाजप-राष्ट्रवादी प्रचारात काँग्रेसची उपस्थिती मर्यादित वाटत असली, तरी प्रत्यक्ष निकालाने पक्षाच्या संघर्षाला यश मिळाल्याचे स्पष्ट झाले.
या निकालामुळे शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी राजकीय वाटचालीसाठी ही निवडणूक पक्षासाठी आशादायी ठरली आहे.

आणखी वाचा   पीएमपी बसमध्ये महिलांचा अपमान करणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुदामे याला ५० हजारांचा दंड