पुणे :



पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना हडपसर परिसरात एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची गंभीर व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सादिक उर्फ बाबू कपूर (वय ५६) यांनी त्यांच्या कार्यालयात आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सादिक यांनी आत्महत्येपूर्वी एक सविस्तर सुसाईड नोट लिहली असून, त्यामध्ये वैयक्तिक वादांचा उल्लेख करण्यात आला आहे. तब्बल ३० पानांच्या या नोटमध्ये काही व्यक्तींची नावे नमूद असल्याचे सांगण्यात येत आहे.
हडपसर भागातील प्रभाग क्रमांक ४१ मध्ये असलेल्या सुमारे पाच गुंठे जमिनीच्या वादातून संबंधित प्रकरण घडल्याची माहिती आहे. या वादामुळे सादिक मानसिक तणावाखाली असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत आहे. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून त्याचा सखोल अभ्यास सुरू आहे.
या घटनेची नोंद लष्कर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कोणताही गुन्हा घडला आहे का, याचा तपास सुरू आहे. तसेच, सादिक यांची पार्श्वभूमी तपासली असता त्यांच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहितीही समोर आली आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे विविध चर्चांना उधाण आले असून, पुढील तपासातून नेमके काय निष्पन्न होते याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
















