निष्ठावंतांना डावलल्याची खंत ; भाजपला मेधा कुलकर्णींचा सूचक इशारा

पुणे :

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेल्या गोंधळावर आता पक्षाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी थेट भाष्य करत निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बाजूने भूमिका घेतली आहे. राज्यभरात उमेदवारी वाटपावरून उसळलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्यक्त केलेली नाराजी म्हणजे पक्षासाठीचा ‘घरचा इशारा’ मानला जात आहे.
वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना डावलून नव्याने आलेल्या किंवा आयात उमेदवारांना संधी दिल्याने अनेक ठिकाणी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर सूचक शब्दांत पक्षाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
“कुछ कह गए, कुछ सह गए… कुछ कहते कहते रह गए,” असा शेर पोस्ट करत त्यांनी निष्ठावंतांच्या भावनांचे प्रतिनिधित्व केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पुण्यासह राज्यातील विविध शहरांमध्ये उमेदवारीवरून कार्यकर्त्यांचा संताप उघडपणे समोर आला आहे. घेराव, घोषणाबाजी, आरोप-प्रत्यारोप, तसेच काही ठिकाणी टोकाची पावले उचलण्याचे प्रकार घडले. या सगळ्या घडामोडींकडे लक्ष वेधत मेधा कुलकर्णी यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करणे पक्षाला भविष्यात महागात पडू शकते, असा स्पष्ट संकेत दिला आहे.
भाजपने घराणेशाहीला विरोधाची भूमिका मांडली असतानाच काही ठिकाणी त्याच कुटुंबातील अनेकांना उमेदवारी देण्यात आल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विसंगतीवरही अप्रत्यक्षपणे बोट ठेवत मेधा कुलकर्णी यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीत आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे सुचवले आहे.
मेधा कुलकर्णींच्या या भूमिकेमुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी अधिक ठळकपणे समोर आली असून, आगामी निवडणुकांआधी पक्ष नेतृत्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना कसा दिलासा देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा   लढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ, आपल्या औंध बोपोडीला विकासात अग्रेसर ठेऊ