प्रभाग २५ वरून मविआत तणाव; प्रशांत जगतापांची उमेदवारी पेचात

पुणे :

महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चेत प्रभाग क्रमांक २५ केंद्रस्थानी आला असून, काँग्रेसमध्ये नुकतेच दाखल झालेले प्रशांत जगताप यांची उमेदवारी अडचणीत सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने या प्रभागातील दोन्ही जागांवर ठाम दावा केल्याने मविआतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नव्या वादाची ठिणगी पडली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी मविआकडून लढण्याचा निर्णय झाल्यानंतर शुक्रवारी झालेल्या जागावाटप बैठकीत राष्ट्रवादीने २०१७ मध्ये निवडून आलेल्या प्रभाग २५ मधील जागांवर आपलाच हक्क असल्याचे स्पष्ट केले. या जागांबाबत अंतिम निर्णय पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे घेतील, असेही काँग्रेस नेतृत्वाला सांगण्यात आले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना विरोध करत प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, हा निर्णय स्थानिक काँग्रेस नेत्यांना पूर्वकल्पना न देता घेतल्याने काँग्रेसमध्येही नाराजीचा सूर उमटला आहे. विशेषतः हडपसर-वानवडी परिसरात काँग्रेसचे पारंपरिक वर्चस्व असल्याने जगताप यांच्या प्रवेशाला सुरुवातीपासूनच विरोध होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, प्रशांत जगताप आणि त्यांची आई रत्नप्रभा जगताप या वानवडीतील ज्या दोन जागांवर निवडून आल्या आहेत, त्या राष्ट्रवादीच्या कोट्यातील असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. त्यामुळे या जागांवर काँग्रेसने उमेदवार देऊ नयेत, अशी भूमिका राष्ट्रवादीने मांडली आहे.
काँग्रेसकडून समन्वयाची भूमिका
या पार्श्वभूमीवर काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. जगताप यांचा राष्ट्रवादीसोबत कोणताही वैयक्तिक वाद नसून, त्यांनी वैचारिक भूमिकेतून पक्ष सोडला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीनेही हा मुद्दा वैयक्तिक न करता जागावाटपात सकारात्मक तोडगा काढावा, याबाबत चर्चा सुरू असून राष्ट्रवादीकडून अनुकूल प्रतिसाद मिळत असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.
प्रभाग २५ चा तिढा कसा सुटतो, याकडे आता पुण्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा   गुंड गजा मारणेची पत्नी अजीत पवारांच्या भेटीला