पुणे :



महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजप आणि शिवसेनेतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, या सगळ्या चर्चांदरम्यान भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जवळपास अंतिम केल्याची जोरदार चर्चा आहे. सुमारे ६२ उमेदवारांचा समावेश असलेली ही यादी येत्या २६ डिसेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, महायुतीतील जागावाटप आणि पहिल्या यादीवर अंतिम निर्णय घेण्यासाठी मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीआधी पुण्यातील काही रखडलेले माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून, त्यामुळे राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची चिन्हे आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, युतीबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. शिवसेनेकडून काही जागांची यादी भाजपकडे देण्यात आली असून, त्यावर पक्षातील वरिष्ठ नेते अंतिम निर्णय घेणार आहेत. मागील निवडणुकीत भाजप जिंकलेल्या जागांवर कोणताही बदल न करता, त्या जागांवरील उमेदवारांची पहिली यादी २६ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.
सध्या भाजपकडे १०५ माजी नगरसेवकांचे संख्याबळ असून, इतर पक्षांतून आलेले ११ माजी नगरसेवक व पदाधिकारी धरून भाजपचा महापालिकेतील दावा सुमारे १२६ जागांवर निश्चित झाल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपकडे ३५ जागांची मागणी केल्याचे समजते.
भाजपने आगामी निवडणुकीत किमान १२० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत मनसेही सहभागी झाल्यास, भाजपला तब्बल १४५ जागांवर निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिवसेनेला केवळ १५ ते २० जागांपर्यंतच मर्यादित ठेवण्याचा पर्याय स्थानिक पातळीवर चर्चेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

















