* अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप



पुणे :
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीत समोरासमोर दिसणारी दोन प्रमुख पॅनल प्रत्यक्षात एकाच विचारधारेची असून त्यांच्यातील संघर्ष हा केवळ दिखावा असल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांनी केला आहे. गेल्या दहा वर्षांत महामंडळाच्या कारभारात असलेल्या संचालकांनी चित्रपटसृष्टीच्या प्रश्नांवर ठोस काम करण्याऐवजी अंतर्गत वाद आणि राजकारणातच वेळ घालवल्याचा आरोप त्यांनी केला. प्रस्थापितांची मुजोरी मोडीत काढून महामंडळ आणि सदस्यांच्या हितासाठी आठ अपक्ष उमेदवारांनी एकत्र येऊन संघ उभा केल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या पत्रकार परिषदेला दिग्दर्शक अमोल भावे, निर्माता महादेव शिरोळकर, मानसिंग कदम, कला दिग्दर्शक उल्हास लांडगे या उमेदवारांसह अपक्ष संघाला पाठिंबा देणाऱ्या अभिनेत्री, निर्मात्या भाग्यश्री देसाई या उपस्थित होत्या. अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि शाहीर संभाजी भगत यांच्यासह अनेकांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा अपक्ष संघाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी बोलताना लोणकर म्हणाले की, दोन्ही पॅनलमधील अनेक माजी संचालक वेगवेगळ्या गटांतून निवडणूक लढवत असले तरी त्यांच्यातील परस्पर समन्वय स्पष्ट दिसून येतो. काही उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी दोन्ही गटांनी एकमेकांना मदत केल्याचा आरोप करत त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेला “मिलीभगत” असे संबोधले.

















