छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटकातील दावणगेरे येथील समाधीस्थळावर भव्य मेघडंबरी उभारली 

पुणे :

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटकातील दावणगेरे येथील समाधीस्थळावर भव्य मेघडंबरी उभारण्यात आली आहे. ही मेघडंबरी तब्बल ४५० किलो वजनाची असून, समाधीला संरक्षण कवच मिळाले आहे.हे ऐतिहासिक कार्य पुण्यातील प्रसिद्ध मल्हार भक्त आणि इतिहासप्रेमी डॉ. गौरव भाऊ घोडे यांच्या पुढाकाराने आणि स्वखर्चाने पूर्ण झाले आहे.

पुणेकरांसाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

समाधीची होती दयनीय अवस्था

दावणगेरे जिल्ह्यातील होदिगेरे येथील शहाजीराजे भोसले यांच्या समाधीची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय होती. कोणतेही छत किंवा संरक्षण नसल्याने पाऊस, ऊन आणि वाऱ्याचा थेट मार सहन करावा लागत होता. शिवभक्तांकडून वारंवार संवर्धनाची मागणी होत असतानाही कर्नाटक सरकारकडून फक्त आश्वासने मिळत होती.या पार्श्वभूमीवर श्री स्वामी ॐ मल्हारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना ऐतिहासिक वारसा व मंदिर संवर्धन महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ. गौरव भाऊ घोडे यांनी स्वतः पुढाकार घेतला.

४.५ लाखांचा खर्च, एका रात्रीत गनिमी कावा

रविवार, २४ मे २०२६ रोजी सुमारे ४.५ लाख रुपये स्वखर्च करून ४५० किलो वजनाची भव्य आणि मजबूत मेघडंबरी समाधीवर बसविण्यात आली. हे काम “वेडात मराठे वीर दौडले ७” या मावळ्यांच्या टीमने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रात्रीत पूर्ण केले. प्रसाद चव्हाण, आकाश चव्हाण, काशिनाथ ओझरकर, महावीर पाटोळे, सुनील ढवळे आणि अविनाश कदम यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामसाहेब रेपाळे यांच्या सहकार्याने हे काम यशस्वी झाले.

याबाबत माहिती देताना डॉ. गौरव भाऊ घोडे म्हणाले की,”छत्रपतींच्या इतिहासाचे आणि वारशाचे जतन करणे ही प्रत्येक शिवभक्ताची जबाबदारी आहे. आम्हाला ही सेवा करण्याची संधी मिळाली, हे आमचे भाग्य आहे.” श्री स्वामी ॐ मल्हारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या १८ वर्षांपासून अनेक ऐतिहासिक स्थळे, मंदिरे आणि वारसा संवर्धनाचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा   १९ वी भीमथडी जत्रा महोत्सवाची तयारी पूर्ण

शिवभक्तांसाठी अभिमानाचा क्षण

शिवप्रेमींसाठी हा क्षण अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद मानला जात आहे. शहाजीराजे भोसले यांच्या स्मृतीला योग्य न्याय मिळाला असल्याची भावना शिवभक्तांमध्ये व्यक्त होत आहे.