९३३ कोटींची थकबाकी थकीत; पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर टांगती तलवार

पुणे :

शहराच्या पाणीपुरवठ्यावर पुन्हा एकदा संकटाची छाया दाटली आहे. जलसंपदा विभागाने मंजूर केलेला ११.६० टीएमसी पाणीकोटा येत्या पंधरवड्यात संपणार असून, तब्बल ९३३ कोटी रुपयांची थकबाकी तातडीने न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे महापालिका काय भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
खडकवासला प्रकल्पातून शहराला पाणी
पुणे शहरासाठी खडकवासला प्रकल्प साखळीमधून दरवर्षी ११.६० टीएमसी पाणी आरक्षित केले जाते. प्रकल्पातील एकूण साठा २९ टीएमसी असून, बाष्पीभवनानंतर उर्वरित पाणी ग्रामीण भागातील सिंचनासाठी वापरले जाते. मात्र चालू आर्थिक वर्षात महापालिकेने मंजूर मर्यादेपेक्षा अधिक पाणीवापर केल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे.
विभागाच्या आकडेवारीनुसार, ३१ जानेवारीअखेर ११.२३ टीएमसी पाणीवापर झाला असून, उर्वरित ०.३६ टीएमसी पाणी पुढील १५ दिवसांत संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंजूर कोटा पूर्ण झाल्यानंतर धरणातून पाणी उचलण्यास परवानगी राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अतिरिक्त वापरावर दंडात्मक कारवाई
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्या नियमांनुसार मंजूर कोट्यापेक्षा २५ टक्क्यांपर्यंत जादा वापर केल्यास दीडपट दराने, तर त्यापेक्षा अधिक वापर झाल्यास तिप्पट दराने शुल्क आकारले जाते. २०१६ पासून अतिरिक्त पाणीवापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेवर दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे.
सध्या एकूण थकबाकी ९५२ कोटी ६२ लाख रुपये असल्याचे सांगितले जात असले, तरी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत १९ कोटी ७५ लाखांची भरपाई झाल्यानंतरही सुमारे ९३२ कोटी ८८ लाख रुपये बाकी असल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे. दरमहा केवळ १० कोटी रुपये पाणीपट्टी भरली जात असल्याने थकबाकी वाढत गेल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
महापालिकेची भूमिका काय?
दरम्यान, संबंधित बिलआकारणी चुकीच्या पद्धतीने केल्याचा दावा महापालिकेने केला आहे. आयुक्त नवल किशोर राम यांनी राज्य सरकारकडे पत्र पाठवून ‘रास्त थकबाकी अदा केलेली आहे’ असे स्पष्ट केले आहे. तसेच प्राथमिक विवाद निवारण अधिकाऱ्यांकडेही अपील दाखल करण्यात आले आहे.
जलसंपदा विभागाने मात्र ‘थकबाकी तत्काळ भरा, अन्यथा मंजूर कोटा संपल्यानंतर पाणीपुरवठा थांबवावा लागेल,’ असा ठाम इशारा दिला आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत पुढील काही दिवस निर्णायक ठरणार आहेत.

आणखी वाचा   विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार