भाजपाला धक्का : अमोल बालवडकर राष्ट्रवादीत, अजित पवारांशी भेट घेत प्रवेश 

पुणे :

पुण्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडताना दिसत आहे. भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर विद्यमान नगरसेवक अमोल बालवडकर यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे वाटचाल केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बालवडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजपाने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यामुळे आपण नाराज असल्याचे अमोल बालवडकर यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षाच्या नेत्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण माघार घेतली होती आणि मोठ्या मताधिक्याने चंद्रकांत पाटील यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केले, असे त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर पक्षाने आपल्याशी विश्वासघात केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

“जर दोन दिवस आधीही मला उमेदवारी नाकारण्याची कल्पना दिली असती, तर मी तो निर्णय समजून घेतला असता. पण शेवटच्या क्षणी डावलण्यात आल्याने माझा आत्मसन्मान दुखावला,” असे बालवडकर म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला गेला नाही, असा आरोप करत त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला.

या घडामोडीमुळे पुण्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, अमोल बालवडकर यांच्या भूमिकेमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

आणखी वाचा   ६६ बिनविरोध विजयांवर संशयाची छाया